पुणे : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पुढाकाराने आज पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनाही वैयक्तिक आमंत्रण दिल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. पण या नेत्यांपैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.


नाशिक इथल्या छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीमधल्या राज्यस्तरीय मराठा समन्वयकांच्या बैठकीला विनायक मेटे उपस्थित राहिले नव्हते. ही बैठक त्यांची वैयक्तिक बैठक आहे असं सांगून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील या बैठकीला उपस्थित नव्हते.


या बैठकीमध्ये 25 ठराव मंजूर केले गेले. शासनाने 1 नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व समाज रस्त्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसंच मराठा आरक्षणावरचा निर्णय होईपर्यंत एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याचा ठरावही या बैठकीमध्ये पारित करण्यात आला.


EWS अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं; आरक्षणाबद्दल संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांची वेगळी भूमिका


उदयनराजेंच्या अनुपस्थितीवर बोलताना विनायक मेटे म्हणाले की, “मेटे- उदयनराजेंना मी स्वत: आमंत्रण दिलं होतं. आज ते का आले नाहीत माहीती नाही. पण काही तातडीचं काम आलं किंवा आणलं गेलं माहिती नाही. पण पुढच्या आठवड्यात साताऱ्याला सगळ्या महत्त्वाच्या मराठा नेत्यांची मी बैठक आयोजित करणार आहे असं त्यांनी मला सांगितलं.”


माजी मंत्री राम शिंदे यांनाही उदयनराजे भेटले नाही

धनगर आरक्षणाचा प्रश्न घेऊन आज पुण्यात माजी मंत्री राम शिंदे उदयनराजेंना भेटणार होते. मात्र, भेटण्यच्या ठिकाणापर्यंत येऊन उदयनराजे परत गेले. तातडीचं काम आल्यामुळे ही भेट पुढे ढकलल्याचा निरोप उदयनराजेंनी पाठवल्याचं स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिलं. धनगर आरक्षण्याच्या मुद्द्यावरुन उदयनराजेंची भेट घेणार होतो, असं राम शिंदे यांनी सांगितलं. बोलताना राम शिंदे म्हणाले की, “विरोधात असलं की जो तो धनगर आरक्षण देऊ म्हणतो आणि सत्तेत आलं की मात्र आरक्षण रखडतं” असं म्हणत भाजपला राम शिंदे यांनी एकप्रकारे घरचाच आहेर दिलाय. धनगर आरक्षणासाठी राजकारणापलिकडे विचार केला पाहीजे, असंही राम शिंदे यांनी सांगतिलं. उदयनराजे राम शिंदे यांना त्यांच्या एका परिचिताच्या घरी भेटायला येणार होते. मात्र, मीडियाची गाडी दिसल्यावर उदयनराजे अर्ध्या वाटेतूनच परत गेले.

Vinayak Mete | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे बीडच्या तरुणाचा बळी, विनायक मेटेंची सरकारवर टीका