Vikram Gokhale : जिद्द, चिकाटी आणि ध्येय असेल तर जगात कोणतीही गोष्ट अवघड नाही. संकटाच्या छाताडावर जिद्दीचा ध्वज रोवून खंबीरपणे आणि ताठ मानेने आपण उभे राहिलो तर यशाचा ध्वज मोठ्या दिमाखात फडकत राहतो, असं अभिनेते विक्रम गोखले पुण्यातील अक्षय परांजपेबाबत म्हणाले होते. आज विक्रम गोखलेंनी जगाचा निरोप घेतला मात्र अशा अक्षयला 'अक्षय्य' करण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला होता. त्यानंतर शिस्तप्रिय अन् बेधडक विक्रम गोखलेंचं हसू अक्षयने विलक्षण टिपलं आहे.
पुण्यातील फोटोग्राफर अक्षय परांजपे याचं आयुष्य विक्रम गोखले यांनी बदलून टाकलं. तंदुरुस्त आणि निरोगी माणसाचं आयुष्य बदलणं सोपं असतं मात्र विल्सन या दुर्मिळ आजाराने बाधित असलेल्या आजाराशी झुंज देत असलेल्या अक्षयला विक्रम गोखलेंनी दिलेल्या हिमतीने आजारातून बाहेर पडून फोटोग्राफीच्या प्रेमात पाडलं. अक्षयला काही वर्षांपूर्वी विल्सन हा दुर्मिळ आजार झाला होता. या आजारात व्यवस्थित चालता, बोलता येत नाही. या दुर्मिळ आजारावर मात केली आणि अक्षय फोटोग्राफीकडे वळला.
फोटोग्राफी करणं म्हणजे धावपळ आणि प्रत्येकाच्या आयुष्यातले चांगले क्षण टिपणं आहे. त्यामुळे अक्षयला फोटोग्राफी आवडते. मागील काही वर्षांपासून तो अनेक कार्यक्रमात फोटोग्राफी करतो. फक्त व्यक्तीविशेष फोटोग्राफी करतच नाही तर अनेक चांगले आणि दुर्मिळ फोटोदेखील त्यांनी टिपले आहेत. फोटोग्राफी करण्याचं पहिलं काम त्याला विक्रम गोखले यांनी दिलं होतं, असं तो सांगतो.
रत्नागिरीच्या एका कार्यक्रमात त्याची आणि विक्रम गोखलेंची भेट झाली होती. त्याने विक्रम गोखलेंची सुंदर फोटो टिपले होते. ज्यावेळी त्याने ते फोटो विक्रम गोखलेंना दाखवले, त्यावेळी विक्रम गोखले अवाक झाले होते. हा कोण आहे, याला काय नेमकं झालंय? आजारी असूनही एवढी सुंदर फोटोग्राफी करतो. त्यांचे हे शब्द आज माझ्या कानात फिरत आहेत. मी आणि त्यांनी कधीच सोबत फोटो काढला नव्हता. मात्र एक दिवस तेच म्हणाले की अक्षय आपण फोटो काढू, तोच फोटो मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. मी त्यांना काका म्हणायचो आज काका नाहीत हे मान्यच होत नाहीये, असं तो सांगतो.
आतापर्यंत अनेकांचे फोटो काढले
अक्षयने आतापर्यंत अनेक नेते, अभिनेते यांचे उत्तम फोटो काढले आहेत. त्यात स्वप्निल जोशी, ह्रदयनाथ मंगेशकर, महेश काळे यांचे देखील त्याने फोटो काढले आहेत. दुर्मिळ आजारावर मात करत त्याने विक्रम गोखले यांनी दिलेल्या हिंमतीवर अनेकांचे आनंदाचे क्षण टिपत आहे.