Vikram Gokhale passes away :  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखलेंच्या निधनामुळे अभिनयाचं एक पर्व हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 77 व्या वर्षीदेखील त्यांनी अभिनयाचा ध्यास सोडला नव्हता. संध्याकाळी सात वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते किशोर कदम, अभिनेता सुबोध भावे यांच्यासह अनेक जण विक्रम गोखले यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. विक्रम गोखले अभिनयाचं विद्यापीठ होते. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी मराठीच नाही तर बॉलीवूडमध्येही महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. नवोदित कलकारांसाठी ते एक विद्यापीठ होतं. प्रकृती खालावल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देखील त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र, आज दुपारी त्यांचे निधन झाले. 


विक्रम गोखले यांच्यासारख्या हरहुन्नरी कलाकाराच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनय क्षेत्रातील अनेकांनी आपल्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर नाना पाटेकर, शरद पोंक्षे यांनी देखील ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 


'नट जातो मात्र भूमिका कायम राहते' त्यांचा हा नटसम्राटमधील डायलॉग आज खरा ठरला आहे. त्यांच्या अनेक भूमिकांनी आपल्याला हसवलं, समजवलं, शिस्त दाखवली तर कधी रडवलं. मात्र सगळ्या भूमिकेत त्यांची वेगळी छाप होती. प्रत्येक भूमिकेत ते आपली छाप सोडत असत. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या बहूआयामी भूमिकेतून ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. 


बालगंधर्व रंगमंदिरात चाहत्यांची गर्दी
विक्रम गोखले याचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या आठवणीदेखील शेअर केल्या. कलाकार आणि चाहत्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. 


राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.