Maharashtra Political News: महाराष्ट्रात (Maharashtra News) काही दिवसांपूर्वी झालेल्या बंडानंतर राज्यात राजकीय भूकंप (Maharashtra Political Crisis) झाला. शिवसेनेचे (Shiv Sena) निष्ठावान म्हणून ओळखले जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) काही आमदारांसह सूरत ते गुवाहाटी प्रवास करत थेट पक्षाला आणि पक्षप्रमुखांनाच आव्हान देत बंड केलं. या बंडाचे परिणाम अद्यापही राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहेत. पण एकनाथ शिंदेंनी हा बंड का केलं? या बंडाची बीजं नेमकी कोणी पेरली यासंदर्भात आता शिंदे गटातील एका माजी आमदाराचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.


बंडाची बीजं मीच एकनाथ शिंदेंच्या मनात पेरली असा दावा माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) निवडणुकीपूर्वीच ठरवली होती, असाही गौप्यस्फोट विजय शिवतारेंनी केला आहे. 


विजय शिवतारेंचा एक व्हिडीओ समोर आलाय, त्यामध्ये ते म्हणालेत की, "ही महाविकास आघाडी नंतर नाही झाली, आतलं खोल राजकारण सांगतो तुम्हाला 70 सीट तुमच्या आमच्या निव्वळ आम्हाला लढवून घालवल्या आणि त्या उद्धव ठाकरेंनीच घालवल्यात. महाविकास आघाडी नंतर नाही झाली, फसवतायत लोकांना अगोदरच झाली होती."


उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती, असा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर समझोता झाल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी विरोधात उठाव करायचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात मीच पेरल होतं, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. साडेचार तास नंदनवनमध्ये बसून मी शिंदे यांना तयार केल्याचा दावाही विजय शिवतारे यांनी काल सासवडमध्ये केला आहे. 


विजय शिवतारे नेमके कोण? 


विजय शिवतारे हे पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. यापूर्वी ते पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येत असत. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रिपद सांभाळलं आहे. त्यांनी साताऱ्याचे पालकमंत्रिपदही भूषवलं होतं. पण त्यानंतर राज्यात बंड झालं आणि शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. त्यानंतर अनेकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामध्ये विजय शिवतारेंचाही समावेश होता. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विजय शिवतारेंनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासूनच सातत्यानं ठाकरेंवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिंदे गटातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये विजय शिवतारेंचाही समावेश होतो. 


विजय शिवतारे, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवतारे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवतारेंना पराभवाचा धक्का बसला होता.