बारामती : भाजप हा सर्वाधिक थापाड्या पक्ष असून या पक्षानं केवळ देशात व राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. प्रांतीय पक्षांना संपवून स्वत:ची ताकद वाढवणं इतकंच या पक्षाचं ध्येय असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपशी तडजोड करणार नसल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं.
गुंड प्रवृत्तींना सोबत घेऊन एक नंबरचा पक्ष म्हणून मिरवण्याची पद्धत भाजपनं अवलंबली आहे. तसेच कर्जमाफी करण्याची मागणी असताना शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं आश्वासन या सरकारनं दिलं. त्यामुळे जनतेला जी आश्वासनं दिली, ती पूर्ण करण्यातही हे सरकार अपयशी ठरल्याची टीकाही शिवतारे यांनी केली.
राज्यात आगामी निवडणुकांमध्ये भाजपशी युती न करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनं लढण्याचं धोरण स्वीकारलं असून त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या जात आहेत. आज बारामतीत सेना उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने शेतकऱ्यांना 6 हजार 500 कोटींची मदत देण्याची घोषणा केली, कापसाला चांगला दर देण्याची घोषणा केली, मात्र एकही घोषणा प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे भाजप हा थापाड्या पक्ष असल्याचं समोर आल्याचं शिवतारे म्हणाले.
आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आपला पहिल्या नंबरचा शत्रू आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत या पक्षाशी एका मतासाठीही तडजोड न करण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचंही शिवतारे यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी नोटाबंदी करून मोठ्या उद्योजकांची सोय केल्याची टीकाही शिवतारे यांनी केली. प्रांतीय पक्षांना संपवण्याचं धोरण भाजपनं अवलंबलं आहे. गुंडांना सोबत घेऊन भाजपनं राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून मिरवायला सुरुवात केली.