Eknath Shinde in Pune: पुण्यात (Pune) प्रति बालाजी, प्रति शिर्डी ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत. आता मात्र पुण्यात प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा (Eknath shinde) आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी विजयराजे माने(Vijayraje mane) हे काही दिवस झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा वेष धारण करून पुण्यात फिरत आहेत. त्यामुळे अनेक लोक त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत तर काहीजण त्यांना आपल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून निवेदने देत आहेत. 21 जूनपासून आपला चेहरा एकनाथ शिंदेसारखा दिसू लागल्याच त्यांच म्हणणं आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून पांढरे कपडे घालतो
भारतीय जनता युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी विजयराजे माने यांनी हूबेहूब मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या सारखा लूक केला आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातले एकनाथ शिंदे किंवा प्रती एकनाथ शिंदेदेखील म्हटलं जात आहे. सुरुवातीला माने रंगीत कपडे परिधान करत होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना एकनाथ शिंदे यांच्यासारखे पांढरे कपडे परिधान करा, अशी विनंती केली. त्या सगळ्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी पांढरे कपडे परिधान करायला सुरुवात केली. मी मुख्यमंत्र्यासारखा दिसतो, असं जेव्हा लोक सांगतात तेव्हा आनंद होतो, असं माने सांगतात.
मागण्या, प्रसिद्धी आणि सेल्फी
विजयराजे माने यांनी एकनाथ शिंदेंचा वेश धारण केल्यापासून त्यांच्याकडे अनेक लोक वेगवेगळ्या मागण्या घेऊन येत आहेत. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. समस्या मांडताना दिसत आहेत. त्यासोबतच अनेक मंडळींनी त्यांच्यासोबत सेल्फिसुद्धा काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
फक्त वेष नाही तर लोकांची सेवाही करणार
विजयराजे माने यांनी एकनाथ शिंदेंचा वेश धारण केला आहे. मात्र फक्त वेश घारण करुन प्रसिद्ध होणार नाही तर लोकांची सेवादेखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम मला आवडतं. जनतेची सेवा करण्यासाठी ते कायम तत्पर असतात. मलाही तशीच जनतेची सेवा करायची आहे, असं ते सांगतात. यंदा संधी मिळाली तर निवडणूक लढवणार असल्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर याच वेशात जाणार
उद्या म्हणजेच 2 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. संधी मिळाली तर एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांना माझा हा लूक दाखवणार आहे. त्यांच्यासोबत फोटो देखील काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.