Pune Railway Accident Viral : देव तारी त्याला कोण मारी (pune) हे तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा ऐकलं असेल. दरम्यान याचाच एक प्रत्यय पुणे रेल्वे स्थानकावर (railway) आला आहे. 3 जानेवारी रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीस तुकडीतील एका जवानाने स्वतःचा जीव धोक्यात टाकत महिलेचा जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी ही महिला पुणे रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे निघाली होती. प्रगती एक्सप्रेस या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. उशीर झाल्यामुळे ट्रेन काहीशी पुढे गेली होती. धावत्या ट्रेनमध्ये प्रवास करणे हे महिलेला महागात पडलं आणि ती ट्रॅकच्या आणि ट्रेनच्या मध्ये पडली. अवघ्या काही सेकंदाच्या या थरारादरम्यान रेल्वे पोलीस दलाच्या जवानाने हे पाहिलं आणि त्या महिलेला बाहेर ओढले. रेल्वे पोलीस दलातील कार्यरत असणाऱ्या विनोद मीना या जवानाने या महिलेचे प्राण वाचवले.
व्हिडीओतील दृष्य पाहून अनेकांना धडकी भरली
महिलेने मुलीला ट्रेनमध्ये बसवलं होतं. त्याच दरम्यान महिलेने आपल्याकडे असलेल्या बॅगाही आतमध्ये ठेवल्या. त्यावेळी महिला ट्रेनमध्ये बसत होती. बसताना महिलेचा ट्रेनमधून पाय निसटला. महिलेने घट्ट धरुन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेचा पाय खाली अडकला होता. त्याचवेळी आईची सगळी धडपड पाहून मुलगी जोरात ओरडली. त्यानंतर शेजारी असलेल्या लोकांनी गर्दी केली. आरपीएफचे जवान गोळा झाले आणि त्यांनी महिलेचा जीव वाचवला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला. या व्हिडीओतील दृष्य पाहून अनेकांना धडकी भरत आहे.
विनोद मीना यांचं सर्वत्र कौतुक
हा सगळा प्रकार आणि मुलीचं ओरडणं ऐकून रेल्वे पोलीस दलातील जवान विनोद मीना त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी घडत असलेला प्रकार पाहिला आणि प्रसंगावधान राखून जीवाची पर्वा न करता महिलेचा जीव वाचवला. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. आतापर्यंत रेल्वे स्थानकावर अनेकदा असे प्रकार घडले आहेत. मात्र फार कमी प्रमाणात जीवितहानी झाली. अनेकदा रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत जीवाची पर्वा न करता जीव वाचवला आहे. रेल्वे पोलिसांची कामगिरी कायमच कौतुकास्पद असल्याचं बघायला मिळतं. रेल्वे स्थानकावरील लोकांनी अपघाताचा थरार प्रत्यक्ष अनुभवला. यावेळी त्यांच्या रुपात देव धावून आल्याचं बोललं गेलं.