Vasant More Facebook Post : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठांचे सर्वकाही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्याला कारणही तसंच आहे. वसंत मोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता एक पोस्ट लिहिल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं त्यांनी म्हटलं आहे. 


मनसे नेते वसंत मोरे हे त्यांच्या धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांना वेगळा ठसा उमटवला होता. त्याचबरोबर शहरामध्ये मनसेची वाढ करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. वसंत मोरे यांची तरूणांमध्येही एक प्रकारची क्रेझ असल्याचं दिसून येतंय. मात्र गेले काही दिवस ते पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज असल्याची चर्चादेखील सुरू आहे. 


मध्यरात्रीच्या पोस्टमधून खदखद व्यक्त


याच चर्चांना आता वसंत मोरे यांच्या पोस्टमधून पाठबळ मिळतंय. वसंत मोरे यांनी मंगळवारी मध्यरात्री फेसबुकवर एक पोस्ट लिहिलीय. त्यामध्ये ते म्हणतात की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. 


 



वसंत मोरेंना त्रास कुणाचा? (Pune MNS Vasant More) 


कुठेही अन्याय होवो, त्या ठिकाणी जातीनं हजर राहून न्याय मिळवून देणे, कोणतीही समस्या आपल्या स्टाईलने सोडवणे आणि धडाडीने काम करणे ही वसंत मोरे यांची खासियत. त्याचमुळे ते लोकांमध्येही प्रसिद्ध आहेत. पण इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे असणाऱ्या वसंत मोरे यांना स्वतःला कुणाचा त्रास आहे? त्यांना कोणता त्रास आहे? त्यांची कोंडी कुणी करतंय? हे असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. त्यामुळेच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केल्याचं दिसतंय.  


वसंत मोरे लोकसभेसाठी इच्छुक (Pune Lok Sabha Election) 


लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरेंनी त्यांची तयारी सुरू केली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती.


शरद पवारांच्या भेटीला (Vasant More Meet Sharad Pawar) 


पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेले वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच त्या बैठकीत वसंत मोरे पोहोचल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यामुळे वसंत मोरे यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली की काय अशी चर्चा सुरू होती. 


ही बातमी वाचा: