पुणे : मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना भेटीची वेळ मिळावी यासाठी काल (7 एप्रिल) मेसेज करुन विचारणा केली. मात्र त्यांना राज ठाकरेंकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन कालच हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


यानंतर वसंत मोरे यांनी कालच राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. परंतु राज ठाकरे यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरेंनी शहरातील प्रमुख नेत्यांना काल मुंबईत बोलावलं होतं. परंतु यात वसंत मोरेंना निमंत्रण नव्हतं. एवढंच नाही तर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करत साईनाथ बाबर यांच्याकडे जबाबदारी सोपवली.


'या' नेत्यांचा वसंत मोरे यांच्याशी संपर्क
दरम्यान वसंत मोरेंना एकीकडे राज ठाकरेंकडून प्रतिसाद मिळालेला नाही पण दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून ऑफर असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी आपल्याला त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिल्याचं वसंत मोरे यांनी कालच म्हटलं होतं. कोणकोणत्या पक्षातून कोणी कोणी आपल्याला संपर्क केली याची माहितीही त्यांनी दिली. "शिवसेनेकडून आपल्याला वरुण सरदेसाई, पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी फोन केल्याचं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, माजी महापौर दत्ता धनकवडे, अप्पा रेणुसे यांनी संपर्क साधला आहे. कॉंग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद शिंदे यांनी संपर्क केला आहे तर भाजपकडून प्रवीण दरेकर यांचाही फोन येऊन गेल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्याला फोन केल्याचं ते सांगत आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आलेला नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.


मनसे सोडण्याचा सध्या विचार नाही
सगळ्या पक्षांकडून विचारणा झाली तरी सध्या आपला मनसे सोडण्याचा विचार नसल्याचं वसंत मोरे म्हणाले. राज ठाकरेंनी सर्वात आधी माझ्या छातीवर मनसेचा बिल्ला लावला आहे," असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे.


पुण्यात मनसेला आणखी एक धक्का
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेचे मुस्लीम नेते नाराज आहे. त्यात पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून एक धक्का बसला आहे. मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर गुढीपाडव्याच्या वेळी मशिदीच्या भोंग्याचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचं होत आहे, असं मत त्यांनी मांडलं आहे. याआधी देखील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.


 


संबंधित बातम्या