पुणे : "मी मनसेसोबतच आहे पण माझ्या प्रभागात मशिदींसमोर भोंगे लावणार नाही," अशी ठाम भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे. "मागील तीन दिवसांत मला राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांच्या ऑफर आल्या. परंतु राज ठाकरेंनी सर्वात आधी माझ्या छातीवर मनसेचा बिल्ला लावला आहे," असंही वसंत मोरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं. यानंतर एबीपी माझासोबत साधलेल्या संवाद वसंत मोरे यांनी भूमिका स्पष्ट केली.


वसंत मोरे म्हणाले की, "पुणे मनसेतील काही लोकांना मी शहराध्यक्ष झालेले पचलं नाही. पक्षाच्या नवीन कार्यालयात राज ठाकरे हे स्वतः अनेकदा आले, पण पदाधिकारी आले नाहीत. पक्षातील लोकांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि संघटनेत काम करणारे पदाधिकारी यांच्या भूमिका वेगळ्या झाल्या आहेत. जनतेतून निवडून येणाऱ्यांना जनमताची अधिक जाणीव असते."


"मागील तीन दिवसांत मला राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांच्या ऑफर आल्या. परंतु राज ठाकरेंनी सर्वात आधी माझ्या छातीवर मनसेचा बिल्ला लावला आहे," असं वसंत मोरे म्हणाले. तसंच मनसेचा रिव्हर्स गियर का पडला याचा विचार पक्षाच्या कोअर टीमने करावा असा सल्ला दिला. मात्री मी माझ्या प्रभागात भोंगे लावणार नाही यावर ठाम असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.


साईनाथ बाबर यांच्या नियुक्तीवर वसंत मोरेंचं ट्वीट
राज ठाकरे यांनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं जाहीर केलं. यावर वसंत मोरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं अभिनंदन केलं आहे. "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे" कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!"असं ट्वीट वसंत मोरे यांनी केलं आहे. 


 







साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती
पुणे मनसेतील (Pune MNS) नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज (7 एप्रिल) मुंबईत बोलावलं होतं. राज ठाकरेंच्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलं नव्हतं. अखेर वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. 


'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा', असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे. 


काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते. 


संबंधित बातम्या