पुणे: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर  (Vanraj Andekar) यांच्या हत्या प्रकरणातील पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. वनराज आंदेकर  (Vanraj Andekar) यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून आठ पिस्तूल, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार देखील जप्त केली आहे.


वनराज आंदेकर  (Vanraj Andekar) हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती, दीर, भाचा यांच्यासह इतरांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हत्या करण्यासाठी कोयते, पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारे याला देखील अटक झाली आहे. त्यानंतर आता या घटनेनंतर पसार झालेला आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने आणि खंडणी विरोधी पथकाने काल (बुधवारी) रात्री उशीरा अटक केली आहे. 


त्याचबरोबर वनराज आंदेकर  (Vanraj Andekar) हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला शिवम आंदेकर याच्या जीवाला धोका असल्याचं लक्षात घेऊन त्याला पोलीसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. रविवारी (१ सप्टेंबर) वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठ परिसरातील त्यांच्या घराजवळ पिस्तुलातून गोळ्या घालण्यात आल्या, त्याचबरोबर कोयत्याने २४ वार करण्यात आले या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी शिवम वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यासोबत होता. हल्लेखोरांनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, थोडक्यात त्याचा जीव वाचला. 


हत्यारं पुरवणारा आरोपी अटकेत


पुण्यातील (Pune Crime) वनराज आंदेकरांचा (Vanraj Andekar) गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. आरोपींना संगम वाघमारेनं या वीस वर्षांच्या मुलानं शस्त्र पुरवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेनं आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सापळा लावून मोठ्या शिताफीनं आरोपीला पकडल्याची माहिती मिळत आहे. वाघमारेला अटक करून रविवारी न्यायलायात हजर करण्यात आले. त्याला 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.        


नेमकं काय घडलेलं?


सहा ते सात टू व्हीलरवरुन तेरा ते चौदा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्यानं वार केले. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केला. घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तेरा ते चौदा जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर कोयत्यानं वारही केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं, हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.