पुणे : शहरातील वैष्णवी हगवणे (vaishnavi hagawane) आत्महत्याप्रकरणात पोलिसानी 5 जणांना अटक केली होती. त्यामध्ये, वैष्णवीच्या पती,सासू आणि नणंदेला सर्वात अगोदर अटक करण्यात आली होती. तर, फरार असलेल्या सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांस मध्यरात्री बेड्या ठोकल्या होत्या. आता, याप्रकरणी, पोलिसांनी (police) आणखी 5 जणांना अटक केली असून एका माजी मंत्र्‍यांच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातून (Pune) पळून गेलेल्या राजेंद्र आणि सुशील यांना आसरा देण्याच्या आणि पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे 17 मे ते 22 मे या कालावधीत अटक टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपुन राहीले होते. या कालावधीत त्यांना आसरा देणाऱ्या 5 जणांना बावधन पोलीसांनी अटक केली आहे‌. त्यामध्ये, राजेंद्र हगवणे यांच्या मित्रासह कर्नाटकमधील एका माजी मंत्र्‍यांच्या मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रितम वीरकुमार पाटील असं आरोपीचं नाव असून तो माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. मोहन भेगडे (मित्र), मोहन बंडू फाटक (पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक), अमोल जाधव (सातारा जिल्ह्यातील पुसेगाव मधे हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा देणारा), राहूल जाधव (सातारा जिल्ह्यातील पुसेगाव मधे हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा देणारा ) आणि प्रितम वीरकुमार पाटील (काँग्रेसचे कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा, कर्नाटकातील कोगनोळी या ठिकाणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याबद्दल अटक) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

वैष्णवीच्या अंगावर 29 व्रण, सासरच्यांकडून छळ

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी देखील वैष्णवीचा मोठा छळ करण्यात आल्याचं आता शवविच्छेदन अहवालातून समोर येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आला आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला सासरच्या लोकांनी मारहाण केली. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण 29 व्रण आहेत, त्यातील 5 ते 6 व्रण ताजे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.  

Continues below advertisement

हेही वाचा

असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो