पुणे : शरीराला इजा झाली आणि कित्येक दिवस रक्तस्त्राव थांबलाच नाही, तर? पुण्यातला महेश हे वयाच्या आठव्या वर्षापासून हे दुखणं भोगत आहे. या विकाराचं नाव आहे 'हिमोफिलिया'. पण आता त्याच्या या विकारावर उपचार करण्यासाठी लागणारी लसच महाराष्ट्रात शिल्लक नसल्याचं समोर आलं आहे.


खरं तर जगभरातल्या प्रत्येक हिमोफिलियाग्रस्ताला उपचार मोफत मिळावेत असा संकेत आहेत. आपल्या राज्य सरकारलाही त्यासाठी 25 कोटी मिळाले. पण फक्त 5 कोटींचा निधी वापरुन 20 कोटी पुन्हा केंद्राकडे परतले.

यंदा आमचं नियोजन चुकलं. बाहेरच्या राज्यातल्या पेशंटमुळे आपल्याला लस कमी पडली, पण लवकरच मागवून घेऊ, असं राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं.

हिमोफिलिया म्हणजे काय?

हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे. यात रुग्णाच्या शरिरात रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो. शरीराला इजा झाल्यास, रक्तस्त्राव थांबत नाही. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यास शरीराला सूज येते. विशेषतः सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊन कायमचे अपंगत्व येते.

एकट्या पुण्यात या रोगाचे 800 रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रभरातल्या रुग्णांची संख्या 4 हजारांच्या घरात आहे. याशिवाय 20 हजारांची लस ही प्रत्येकाला परवडणारी नाही. त्यामुळे निधी परत पाठवण्याची घाई करण्यापेक्षा तो गरजूंसाठी वापरण्याची तत्परता सरकारनं दाखवावी, इतकीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.