Pune G-20 :  पुणे शहर पोलिसांनी (Pune) सेनापती बापट रोड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2 किलोमीटरच्या परिसरात 10 ते 20 जानेवारी दरम्यान ड्रोनकॅमेरा वापरण्यावर बंदी केली आहे. 16 आणि 17 जानेवारी जी-20 च्या परिषदेनिमित्त हे निर्बंध लावण्यात आले आहेत. 


पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) राजा रामास्वामी यांनी आदेश जारी केले आहेत. त्यात त्यांनी निर्बंध लावण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.  29 देशांचे सुमारे 200 प्रतिनिधी आणि 15 आंतरराष्ट्रीय संस्था शहरातील G20 बैठकींना उपस्थित राहणार आहेत. हे प्रतिनिधी सेनापती बापट रोडवरील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये राहतील.  पुणे विद्यापीठ आणि इतर ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना ते उपस्थित लावणार आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अनेकांकडून ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे 10 ते 20 जानेवारी दरम्यान सेनापती बापट रोड  आणि पुणे विद्यापीठाच्या 2 किमीच्या परिसरात ड्रोनचा वापर करण्यास सक्त मनाई असेल, असंही त्यांनी आदेशात म्हटलं आहे. 


तर होणार कारवाई...


सेनापती बापट रोड  आणि पुणे विद्यापीठाच्या 2 किमीच्या परिसरात कॅमेरा ड्रोन वापरताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर IPC कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. कोणतीही कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे. 


अनेक देशाच्या प्रतिनिधींचा समावेश


जी-20 समुहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, तुर्की, इंग्लंड, अमेरिका आणि युरोपीय महासंघाचा समावेश आहे. येत्या सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या 'जी-20 परिषदेत 37 राष्ट्रांचे प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे.


G20 साठी पुण्यात जय्यत तयारी


पुण्यात पहिली बैठक 16 आणि 17 जानेवारी  2023 रोजी होणार असून प्रशासनातर्फे त्याची तयारी करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील रस्त्यांचे आणि चौकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.  प्रत्येक पुणेकर नागरिक या बैठकांचा यजमान असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना या आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये शुशोभिकरणाचं काम सुरु आहे. शहरात अनेक ठिकाणी रंगरंगोटीचं काम सुरु आहे. यात परिषदेसाठी पुण्यातील अनेक चौकांमधील होर्डिंग्सदेखील काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.