Pune Mahavitaran Strike : राज्यातील महावितरणच्या  संपाचा (Pimpri-chinchwad)  पिंपरी-चिंचवडमधील (Mahavitaran Strike) लघुउद्योगांना मोठा फटका बसला आहे. या परिसरातील अनेक लघुउद्योग वीजपुरवठा नसल्याने बंद आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगले सुरु असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस वितरण क्षेत्रात समांतर परवाना देण्याचे धोरण अवलंबले आहे. यास विरोध करण्यासाठी आजपासून वीज कर्मचारी,अभियंते 72 तासांच्या संपावर जाणार आहेत. त्याचाच फटका या लघुउद्योगांना बसला आहे. 
 
पिंपरी-चिंचवडमधील परिसरात सुमारे 12000 उद्योग आहेत. त्यापैकी दीड हजारपेक्षा अधिक उद्योगांना फटका बसला आहे. या सगळ्या लघुउद्योगाचं कामकाज आज बंद आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर लघुउद्योगांची नगरी मानली जाते. या परिसरातील लहान कंपनीत जरी वीजपुरवठा  नीट झाला नाही तर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम या लघुउद्योगाच्या कामकाजावर होत असतो. आज सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने दीड हजार कंपन्या बंद असतील तर या सगळ्या कंपन्या मिळून मोठा आर्थिक फटका बसू शकतो. 


दोन सेक्टरमध्ये वीजपुरवठा खंडित


पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरी, आकुर्डी या परिसरात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत. यातील दोन सेक्टरमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.  मात्र याच दोन सेक्टरमध्ये जवळपास दीडनहजार उद्योग आहेत. त्यामुळे कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे.


नगरिकांना संपाचा फटका


पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री एक वाजल्यापासून शहराजवळील ग्रामीण परिसरातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. अनेक नागरिकांची सकाळची शेतीची कामे रखडली आणि त्यासोबतच बाकी कामकाजही ठप्प झालं आहे. 


पुण्यातील बाकी परिसराची स्थिती काय?


पुण्यातील  शिवणे , सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसर, कोंढवे धावडे, कात्रज या परिसरात रात्री 1 वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. ग्रामीण परिसरातही या बंदचा फटका नागरिकांना सहन करावा लागला आहे. चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. या संपात पुण्यातील 13 संघटना सहभागी होणार आहेत. पुण्यातील रास्तापेठ परिसरात 12 ते 6 वाजेपर्यंत आंदोलन करणार आहे. त्यात 4500 कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यासोबतच 1200 कंत्राटी कामगार सहभागी होणार आहे.