बारामती : बांधकाम व्यावसायिक दादा गणपत साळुंखे यांच्या हत्येनं  बारामती तालुक्यात खळबळ माजली आहे. दादा साळुंखे हे बारामतीमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते.  उजनी धरणाच्या पुलाखाली काल संध्याकाळी दादा साळुंखे यांची अज्ञातांनी हत्या केली. 


मयताच्या अंगावरील कपड्यांवर बारामतीच्या सिक्वेरा टेलर्सचा उल्लेख होता. त्यावरून टेंभुर्णी पोलिसांनी बारामती, इंदापूर या भागात  मयताचे फोटो सोशल मिडियावरून प्रसारीत करून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह दादा साळुंखे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दादा यांनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नीला फोन करत काही लोक मला मारत असल्याचे सांगितले होते. संभाषण सुरु असतानाच फोन कट झाला. त्यानंतर तो स्विच्ड ऑफ झाला होता. खरेदी-विक्रीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किंवा उसनेवारी पैशातून हा प्रकार घडला असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

साळुंखे हे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने माजी अध्यक्ष होते. बारामती एमआयडीसीलगतच्या वंजारवाडी येथील ते रहिवाशी आहेत. त्यांच्या आईने वंजारवाडीच्या सरपंच-उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळली आहे. साळुंखे यांचा एमआयडीसीत गौरव वॉटर सप्लायर्स नावाचा व्यवसाय आहे.

दरम्यान, दादा साळुंखे यांचा मोबाईल आणि स्विफ्ट गाडी गायब आहे.

दादा साळुंखेंच्या हत्येप्रकरणी अज्ञाताविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपासही सुरु केला आहे.