पुणे : पुण्यातील मुठा कालवा तिथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला, असा दावा कृष्णाखोरे विकास महामंडळाने हायकोर्टात काल केला. याचसोबत वस्ती उभी राहिल्यामुळे वेळोवेळी तिथे जाऊन पाहणी करण्यात अडचणी येत असल्याचंही सांगितलं. तसेच, कालव्याची पूर्ण दुरुस्ती होण्यासाठी कालवा आता पूर्णपणे बंद ठेवणं गरजेचं असल्याचंही पाटबंधारे विभागाकडून सांगितलं आहे.


नेमकी दुर्घटना काय?

पर्वती भागात 27 सप्टेंबर 2018 रोजी मुठा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र निर्माण झालं होतं. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर आलं. पाणी खूप मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती.

दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं. या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.

27 सप्टेंबरच्या सकाळी अचानक घटलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या दुर्घटनेत सुमारे 980 जण बेघर झाले आहेत. वस्तीत घुसलेल्या पाण्याचा जोर इतका होता की, अनेकांचे संसार वाहून गेले.