पुणे : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापलेल्या पुस्ताकाचं वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण उपसंचालक विकास गरड यांनी हे आदेश दिले आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख आहे.


या पुस्तकाच्या प्रती मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या मजकुरावर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे.


याप्रकरणानंतर आज मराठा क्रांती मोर्चाकडून उपसंचालकांना घेराव घालण्यात आला होता. यावेळी संबधितांवर तातडीनं कारवाईची मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली.


कालच या पुस्तकाच्या लेखिका डॉ. शुभा साठे आणि पुस्तकाची प्रकाशन संस्था लाखे प्रकाशनने याबाबत माफी मागितली होती. तर या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी, पुस्तकाला सर्व शिक्षा अभियानातून त्वरित वगळण्यात यावे आणि लेखक व प्रकाशकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली.


काय आहे प्रकरण?


सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या 18 व्या पानावर संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख आहे. 'रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले', असा उल्लेख या पुस्तकात आहे.