पुणे : युनोस्कोने पुण्यातील लोहगड (Lohgarh fort) किल्ल्याला जागतिक वारसाचा दर्जा दिल्याने पुणेकरांनाही अत्यानंद झाला आहे. यानिमित्ताने या किल्ल्याच्या इतिहासावर एबीपी माझाने प्रकाश टाकला. हा किल्ला कोणी आणि कधी बांधला? महाराजांनी हा किल्ला कितीवेळा काबीज केला? या किल्ल्याची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? याची भौगोलिक रचना कशी आहे? आणि महाराज या किल्ल्याचा वापर नेमका कशासाठी करत होते? या सर्व प्रश्नांचा मागोवा एबीपी माझाच्या टीमने पुण्यापासून (Pune) 50 किमी अंतरावरील किल्ला लोहगड सर करुन घेतला. हा किल्ला कोणी आणि कधी बांधला? तो महाराजांच्या (Shivaji maharaj) ताब्यात कसा आला आणि महाराजांना हा किल्ला किती वेळा काबीज करावा लागला, त्यामागची कारणं काय? याची उत्तरे इतिहास अभ्यासक आणि लेखक संदीप तापकीर यांनी दिली.
हिंदवी स्वराज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले 12 गड किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत, त्यामुळं या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा प्राप्त झालाय. त्यातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला. युनेस्कोने लोहगड किल्ल्याची निवड का केली? हा किल्ला कोणी आणि कधी बांधला? महाराजांनी हा किल्ला कितीवेळा काबीज केला? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुणेकरांना आणि शिवप्रेमींना पडले आहेत. आता, शिवप्रेमींच्या याच प्रश्नांची उत्तरे या लेखातून तु्म्हाला मिळणार आहेत. त्यासाठी, एबीपी माझाच्या टीमने किल्ले लोहगड सर करत याच्या इतिहासातील पाने वाचण्याचा प्रयत्न केला आहे.
हा किल्ला कोणी आणि कधी बांधला? तो महाराजांच्या ताब्यात कसा आला आणि महाराजांना हा किल्ला किती वेळा काबीज करावा लागला, त्यामागची कारणं काय? याची उत्तरे इतिहास अभ्यासक आणि लेखक संदीप तापकीर यांनी दिली. सर्वप्रथम 1657 मध्ये शिवरायांच्या ताब्यात आला, त्यापूर्वी हा किल्ला सातवाहन काळापासून अस्तित्वात आहे. बहमनी यांच्याकडे हा किल्ला होता, त्यानंतर निजामशाहीकडे, पुन्हा अदिलशाहीकडे हा किल्ला गेला. अदिलशाहीकडून 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला हस्तगत केला. महाराजांनी जेव्हा सूरतची 1664 मध्ये जेव्हा लूट केली, तेव्हा सरसेनापती नेताजी पालकर यांनी सर्वप्रथम याच लोहगडावर ते धन आणलं होतं. तर, पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मुघलांना दिले होते, त्यात हाही किल्ला होता. मात्र, 1670 मध्ये हा किल्ला महाराजांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्यासाठी 5000 होन खर्च केल्याची कागदपत्रे आहेत. संभाजी महाराजांच्या ताब्यातही हा किल्ला होता, अशी माहिती तापकीर यांनी दिली.
सर्पाकार द्वाररचना आणि विंचुकाटा माची
सर्पाकार द्वाररचनेचा उत्कृष्ट नमूना म्हणजे हा किल्ला आहे. हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, नारायण दरवाज आणि वरती महादरवाजा असे चार दरवाजे या किल्ल्यावर आहेत. ह्यातील 2 दरवाजे पेशव्यांच्या काळात बांधलेले आहेत, वरती तळ्याच्या काठावर नाना फडणवीस यांनी बांधलेल्या शिलालेख आहे. विंचूकाटा माचीमुळे हा किल्ला अत्यंत महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे. या दरवाजातून पवना धरणात किल्ल्याची उत्तुंग प्रतिकृती दिसून येते. या चारही दरवाजांना उत्तम बांधणीचे बुरूज आहेत. किल्ल्यावर लोमेश ऋषींची गुहा आहे. औरंगजेबाने हा किल्ला जिंकल्यानंतर इथं औरंगजेबाच्या मुलीची कबर असल्याचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. कारण, औरंगजेब हा कधीच या किल्ल्यावर आला नाही, असेही तापकीर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
बोरघाटाचा संरक्षण म्हणून या किल्ल्याचं मोठं महत्त्व आहे. या किल्ल्याच्या आजुबाजूला राजमाची, विसापूर हे प्रमुख किल्ले आहेत. तसेच, तुंग, तुपोना, मोरगिरी यांसारखे अनेक किल्ले इंथ आहेत. शिवपदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे, तुरुंग म्हणून ह्या किल्ल्याचा वापर महाराजांनी केला होता. सूरतेची लूट ठेवण्यासाठीही हा किल्ला वापरला होता. त्यामुळेच, कैदखाना म्हणूनही याला ओळखलं जातं.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेल्या आणि बांधलेल्या गड किल्ल्यांचा आवाज फ्रांसची राजधानी पॅरिसमध्ये घुमला. युनोस्कोने याची दखल घेतली, आता जबाबदारी आहे ती सरकारची. या गड किल्ल्याचं संवर्धन राखण्याची, शिवप्रेमींनी हा जागतिक वारसा जतन करण्याची अन् पर्यटकांनी जागतिक वारसा जपण्याची.
हेही वाचा
राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय?, उज्जवल निकम म्हणाले...