पुणे : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली असली, तरी तिच्यावर आता स्वतः सत्ताधारी गटातीलच आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याच्या या योजनेसाठी अन्य विकासकामांचा निधी वळवला जात असल्याचा आरोप अजित पवार गटातील मंत्र्यांकडून समोर आला आहे. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच इंदापूरमध्ये घरकुलाच्या धनादेश वितरण कार्यक्रमात सहभागी होताना या योजनेबाबत सूचक टिप्पणी केली. त्यांनी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि "विकास निधी वेळेवर मिळत नाही, कारण तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो," असा थेट आरोप केला. भरणेंच्या वक्तव्यावरती आज अजित पवारांनी थेट भाष्य केलं आहे.

नेमका कुठला निधी मिळाला नाही

विकास निधी वेळेवर मिळत नाही, कारण तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो या वक्तव्यावरती अजित पवार म्हणाले, मी त्याला विचारतो. तो माझा सहकारी आहे. मंत्रिमंडळात आहे. नेमका कुठला निधी मिळाला नाही आणि कुठल्या अर्थानं ते बोलले हे त्यांना विचारून सांगतो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. भरणेंच्या  या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. विरोधकांनी यावरून महायुती सरकारला लक्ष्य करत, "लोकप्रियतेच्या राजकारणासाठी मूलभूत विकासकामांना गालबोट लावलं जातंय," असा आरोप केला आहे. तर काही सत्ताधारी नेत्यांनी भरणेंच्या वक्तव्याला वैयक्तिक मत ठरवत योजनेचे समर्थन केले. दरम्यान, "लाडकी बहीण" ही योजना राज्यातील अनेक महिलांना आर्थिक आधार देणारी ठरली आहे. मात्र, योजनेसाठी इतर विकास योजनांचा बळी जात असेल, तर त्यावर गंभीर पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले?

“मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यातून माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आज लाडकी बहिण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला होता. पण आज सर्व हळूहळू गाडी सुरळीत झाली आहे”, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं. त्यावर आज अजित पवारांनी प्रतिक्रिया देत मी त्यांना विचारेन असंही म्हटलं आहे.