पुणे : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत दोन तरुणांनी तुफान राडा घातला. आरक्षणाच्या मागणीची पत्रकं भिरकावत कार्यालयात भंडारा उधळला. इतकंच नाही तर कार्यालयातील साहित्याची तोडफोड करुन काचाही फोडल्या. तसंच कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रं असलेल्या फाईल्सही इतरत्र भिरकावल्या.




दोन तरुण आज दुपारी दीडच्या सुमारास निवेदन द्यायचंय असं सांगत आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत आले. निवेदन देताना  त्यांची एका महिला अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली. त्यानतंर या तरुणांनी हातातील पत्रकं भिरकावली आणि भंडारा उधळला. धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्यावं, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

मग दोन्ही तरुणांनी कार्यालयातून पळ काढला. हे तरुण कोण होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बनवलेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.

पाहा व्हिडीओ