पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे तर्फे जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 22.65 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.


या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 1,02,314 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 1,02,160 विद्यार्थी परीक्षेस पात्र झाले. त्यापैकी 23,140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 22.65 इतकी आहे.

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी करावयाच्या अर्जाची मुदत सोमवार, दिनांक 27/08/2018 ते बुधवार, दिनांक 05/09/2018 आहे.

जुलै-ऑगस्ट 2018 बारावीच्या निकालामध्ये लातूर विभागानं बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक 31.48 टक्के लागला आहे. तर सगळ्यात कमी निकाल मुंबई विभागाचा 19.27 टक्के इतका लागला आहे.

मे मधील निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 30 मे 2018 रोजी जाहीर झाला होता. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी  पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला होता. राज्याचा निकाल यंदा 88.41 टक्के लागला . परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुलं पास झाली आहेत. विद्यार्थ्यांना निकाल बोर्डाच्या www.mahresult.nic.in  या वेबसाईटवर पाहता येईल.

संबंधित बातम्या 

Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 88.41 टक्के  

बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये 

बारावीनंतर काय? करिअरच्या वेगळ्या वाटा... 

दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.41 टक्के