Pune Crime New: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अंगणवाडीचा अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी ही लाच घेण्यात आली असून एसीबीने कॅम्प परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली.


उपअभियंता किरण अरुण शेटे (31) आणि शाखा अभियंता परमेश्वर बाबा हेलकर (49) अशी अधिकाऱ्याची नावे आहेत. शिरगाव येथील अंगणवाडीत विद्युत कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी व वॉटर फिल्टर मशीन बसविण्यासाठी आरोपीने ठेकेदाराकडे 2500 रुपयांची लाच मागितली. याबाबत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचून शेटे आणि हेळकर यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे.


1 कोटी रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुण्यातील मनपा उपायुक्तांवर गुन्हा दाखल


पुणे महापालिकेतील उपायुक्त विजय लांडगे आणि त्यांची पत्नी शुभेच्छा लांडगे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गैरमार्गाने मालमत्ता कमावल्याबद्दल अटक केलीय. तब्बल 1 कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी त्यांंच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा लांडगे पती- पत्नींकडे 31.59 टक्के जास्त मालमत्ता आढळून आली. विजय लांडगे हे पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह विभागात उपायुक्त आहेत. या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच म्हणणं आहे. लांडगेंकडे एक कोटी दोन लाख साठ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. मोठा अधिकारी गाळाला लागल्याने खळबळ उडाली आहे.


एक कोटी रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी ही तक्रार दिली आहे. पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह विभागात उपायुक्त पदावर विजय लांडगे कार्यरत आहेत. संबंधित उपायुक्तांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरू होती. यात अनेक बाबी तापासात पुढे आल्या. ज्ञात उत्पन्नापेक्षा लांडगे पती- पत्नींकडे 31.59 टक्के जास्त मालमत्ता आढळून आली. ही सगळी उपसंपदा पत्नीच्या नावावर असल्याचंही तपासात आढळलं आहे. पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.