Pune Rain Lonavala Rains : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अशात पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात गेल्या चोवीस तासात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. त्यामुळं या मोसमातील उच्चांकी म्हणजेच तब्बल 180 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत लोणावळ्यात 907 मिलिमिटर पाऊस बरसला आहे. यापैकी गेल्या तीन दिवसांतच 492 मिलिमिटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 1132 मिलीमिटर इतका पाऊस झाला होता.


पवना धरणात परिसरात पावसाचा जोर कायम
दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात परिसरात पावसाने जोर कायम ठेवला आहे. गेल्या चोवीस तासात इथं 76 मिलीमिटर पाऊस कोसळला असून धरण साठ्यातील पाणी 22.18 टक्क्यावर येऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा टक्के पाणी साठा कमी असली तरी तूर्तास शहरावरील पाणी कपात टळणार आहे. त्यामुळं शहरवसीयांना हा दिलासा मानला जातोय. तर मावळ तालुक्यातील शेतकरी ही चांगलाच सुखवला आहे. त्यांची रखडलेली भात लागवड आता जोमाने सुरु झाली आहे, सर्व शेतकऱ्यांचे पाय आता शेताकडे वळले आहेत.


पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यात विशेष म्हणजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर जोरदार पाऊस सुरु असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. खडकवासला 13 मिमी, पानशेत 60 मिमी, वरसगाव 55 मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा  5.45 टीएमसी झाला आहे.


पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे.  मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Rain Update : राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' भागात आज रेड अलर्ट!


Maharashtra Rain : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क; पूर येण्याची शक्यता असणाऱ्या कोणत्या जिल्ह्यात काय उपाययोजना