पुणे : तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना थोडं सजग राहणं गरजेचं आहे. कारण या कार्डांची प्रतिकृती म्हणजेच क्लोनिंग तयार करुन लोकांना लुटणारी टोळी राज्यात सक्रिय झालीय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ऑगबेहस फॉर्च्युन आणि बसर उस्मान अशा दोन नायजेरीयन तरुणांना अटक केली आहे.


गेले काही दिवस पुण्यातील अनेकांच्या बँक खात्यातले पैसे परस्पर गायब होत होते.मात्र त्यांचं डेबिट कार्ड त्यांच्याजवळच होतं. शिवाय त्याचा पासवर्डही त्यांनी कोणीशी शेअर केला नव्हता. कोणीतरी परस्पर एटीएममधून हे पैसे काढत होते. अशाप्रकारच्या तक्रारी वाढल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरु केला.

या तपासात पोलिसांना दोन व्यक्ती पिंपळे गुरव भागातील एटीएम सेंटरमधून संशयास्पदरीत्या पैसे काढत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये आढळलं. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोन नायजेरियन तरुणांना अटक केली.

यावेळी त्यांच्याकडून विविध बँकांची 20 डेबीट कार्ड आणि डेबीट कार्डाच्या सात प्रतिकृती सापडल्या. त्याचबरोबर सात मोबाईल फोन्स आणि आठ सिमकार्ड देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

मुंबईत सायबर सेलनं अटक केलेल्या आरोपींनी तब्बल 1 हजार 28 ग्राहकांची माहिती चोरल्याचं उघड झालंय...पुण्यात हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय

दरम्यान, मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात हॉटेलमधील 8 वेटर्सना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून तब्ब्ल एक हजार 28 ग्राहकांची माहिती चोरल्याचा उघड झालं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नायजेरियन्सच्या चौकशीतूनही मोठे खुलासे होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.