पुणे : पुण्यातील 'आयुका' या संस्थेने अवकाशातील नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. या नव्या आकाशगंगेचं नामकरण 'सरस्वती' असं करण्यात आलं आहे.

'आयुका'मध्ये या प्रकल्पावर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरु होतं. 'आयुका'नं शोधलेल्या या नव्या आकाशगंगेचा समूह पृथ्वीपासून जवळपास चारशे कोटी प्रकाशवर्षे दूर आहे.

भारतीय खगोलशास्त्रांना लागलेल्या हा गॅलक्सी महासमूह मीन राशीत सापडला असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, पुराणात लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या संदर्भावरुन या महासमुहाला सरस्वती नाव दिल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

पुण्याच्या 'आयुका'च्या पुढाकारानं झालेल्या या संशोधनात आयसर, एनआयटी जमशेदपूर आणि केरळच्या न्यूमन कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. हजारो दीर्घिकांचे ४३ समूह असलेल्या या महासमुहाचं वस्तुमान दोन कोटी अब्ज सूर्यांइतकं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, ब्रह्मांडात मुळातच खूप मोजके आकाशगंगांचे समुह आहेत. त्या पार्श्वभूमीवर या महासमुहाचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावल्यामुळे जगभरात भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक होत आहे.