पुणे : अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील जुना बाजार चौकातील ही घटना आहे. चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली.

रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्ज काढण्याचं काम सुरु होतं. मात्र ते करत असताना होर्डिंग्जचे अँगल्स वरुन कापत येण्याऐवजी ते खालून कापले जात होते, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यामुळे काम सुरु असताना हे होर्डिंग्ज चौकाच्या मधोमध कोसळले.

त्याचवेळी चौकातून निघालेल्या पाच रिक्षा आणि एका कारमधील प्रवासी  होर्डिंग्जच्या अँगल्सखाली आले. या चौकात पाच रस्ते एकत्र येतात. शनिवार वाडा, पुणे स्टेशन, आरटीओ कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि मंगळावर पेठेतून येणारे रस्ते या चौकात एकत्र येतात.

एवढ्या मोठ्या रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.