पुणे : डेटा करप्टचा मोठा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. पुणे महापालिकेच्या सर्व्हरमधला अति महत्त्वाचा डेटा करप्ट झाला असल्याचं महापालिकेच्या चिफ अकाउंट्स आणि फायनान्स ऑफिसर उल्का कळसकर यांनी बॉम्बे स्टॉक एक्चेंजला लिहिलेल्या पत्रामधून समोर आलं आहे.

2017-18 या फायनान्शियल वर्षातील डेटा सर्व्हरमधून हरवलाय किंवा करप्ट झालाय, असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले असून महापालिकेतला डेटा करप्ट होऊच कसा शकतो, असा सवाल करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

डेटा करप्ट होण्यामागे कोणती कारणे आहेत, हा डेटा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मुद्दाम करप्ट तर नाही करण्यात आला ना, ही महापालिकेच्या प्रशासनाची चूक आहे की, सत्ताधाऱ्यांची चाल आहे याची शहानिशा करण्यासाठी खास सभा बोलवण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे.

या करप्ट झालेल्या डेटाचं महापालिकेकडे बॅकअपही नसल्याचं समोर आलं आहे. तशी कबुली खुद्द पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. तर आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

अतिमहत्त्वाच्या माहितीच्या डेटाचाही बॅकअप जर महापालिकेकडे नसेल तर अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि त्यांच्यावर कुणाचंही नसलेलं नियंत्रण याला जबाबदार असल्याची टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.