पुणे : पुण्यात तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलची सूत्र हाती घेल्यानंतर त्याचं पुणेकरांनी कौतुक केलं. पण पीएमपीएमएलला काही मार्गांवर उत्पन्न मिळत नसल्याचं कारण देऊन कोणतीही पूर्वसूचना न देता 27 मार्गांवरील 38 बस बंद केल्याचा आरोप पीएमपीएल प्रवासी मंचने केला आहे.
पीएमपीएमएलला पुण्याची लाईफलाईन समजली जाते. पीएमपीएमएलची बससेवा नफ्यासाठी नसून, प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने तुकाराम मुंढे यांनी प्रवासी केंद्रीत विचार करावा, अशी मागणीही प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे.
पीएमपीएमएलने गेल्या आठवड्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 27 मार्गांवरील 38 बसेसची सेवा बंद केल्याचा आरोप केला जात आहे. बंद केलेल्या मार्गांतील बहुतांश मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत.
तुकाराम मुंढे यांनी इतर चांगले निर्णय घेतले त्याचं स्वागत करतो, पण चालू मार्ग बंद करू नये, अशी मागणी प्रवासी मंचाने केली आहे.
मध्यवर्ती भागातील फेऱ्याही बंद?
पीएमपीएमएल स्वारगेट, महात्मा फुले मंडई, डेक्कन, पुणे स्टेशन, शनिवारवाडा अशा मध्यवर्ती ठिकाणांहून सुटणाऱ्या फेऱ्याही बंद करण्याच्या विचारत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यांची गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिक पीएमपीएमएलला प्राधान्य देतात. मात्र,मार्ग बंद केल्याने मध्यवर्ती भागात वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. त्यामुळे असा निर्णय झाला असेल तर, तो निर्णय रद्द करावा अशी मागणी प्रवासी मंचाने केली आहे.
पीएमपीएमएल बसला प्रतिकिलोमीटर सरासरी 55 रुपयांचे उत्पन्न मिळतं. मात्र बंद करण्यात येणाऱ्या मार्गांवर धावणाऱ्या बसचं सरासरी उत्पन्न प्रतिकिलोमीटर 12 ते 42 रुपये होतं.
दरम्यान तुकाराम मुंढे यांची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.