पुणे : पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी रोज एका नव्या निर्णयाचा धडाका लावला आहे. ऑन ड्युटी झोपा काढणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचं मुंढेंनी निलंबन केलं आहे.


शनिवारी रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले 9 कर्मचारी झोपल्याचं भरारी पथकाला आढळून आलं. मात्र ही डुलकी या कर्मचाऱ्यांना महागात पडली असून या 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

शहरात एकूण 13 डेपो असून रात्रीच्या वेळेत झोपणाऱ्या कर्माचाऱ्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते. त्यासाठी चार कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आलं होतं. या भरारी पथकाला कोथरुड आणि पुणे स्टेशन आगारातील 9 कर्मचारी झोपलेले आढळून आले.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये दोन बसचालक असून 7 गाडयांची दुरुस्ती करणाऱ्या वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वेळेत कामावर न आलेल्या पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना 30 तारखेला बिनपगारी काम करावं लागलं. तुकाराम मुंढे यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला आहे. उशिरा येणाऱ्या 120 कर्मचाऱ्यांना एका दिवसाचा पगार दिला जाणार नाही.

संबंधित बातम्या :

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरु, PMPML च्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे

तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार स्वीकारण्यास नकार?

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष