पुणे : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलीत गोलमाल करणारे कोथरूड पोलीस ठाण्यातील 5 पोलिस बडतर्फ करण्यात आले आहे. या पोलिसांची चौकशी सुरु होती. त्या चौकशीसाठी एबीपी माझाने दिलेल्या बातमीचा आधार घेण्यात आला होता.


पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस कर्मचारी अजिनाथ शिरसाट, अश्वजित सोनवने, संदीप रिठे आणि हेमंत हेंद्र, अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावं आहेत.

दोन फेब्रुवारीला पुण्यातील काही व्यापारी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी एजंटसोबत निघाले असता, कोथरुड पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे पकडण्यात आलेली रक्कम 3 कोटी रुपयांहून अधिक असतानाही, फक्त 20 लाख रुपयांचे जुने चलन पकडल्याचा गुन्हा कोथरुड पोलिस स्टेशनला करण्यात आला. ही रक्कम एजंट सुरेश अग्रवाल याच्या गाडीतून जप्त करण्यात आली होती.

अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु पैसे नक्की कोणाचे होते याचा तपास पोलिसांनी शेवटपर्यंत केलाच नाही आणि उरलेली रक्कम पोलिसांनी आपसात वाटून घेतली. वरिष्ठ अधिकारीही त्यात वाटेकरी झाले. मात्र या वाटणीतून पोलिसांमधे आपसात बेबणाव  झाला आणि या प्रकरणाला वाचा फुटली.

जप्त केलेली रक्कम 3 कोटींहून अधिक असून, पोलिसांनी ती आपसात वाटून घेतली, असं एजंट सुरेश अग्रवाल याने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त शरद उगले यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली. या चौकशीत 5 पोलिसांनी ही गडबड केल्याचं समोर आल्यावर, त्यांच्यावर गुन्हा नोंद करुन त्यांना बडतर्फ करण्यात आले.

मात्र. पैश्यांच्या या वाटणीत हे पाचच पोलिस सहभागी होते की आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नाही या रकमेतील वाटा मिळाला होता, या प्रश्नाचं उत्तर या चौकशीतून मिळाले नाही.

त्याचबरोबर हे पैसे नक्की कोणाचे होते आणि ते कोणामार्फत बदलले जाणार होते हे ही चौकशीत पुढे आलेले नाही.