पुणे: चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यानं पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. सकाळी 6.20 मिनिटांनी ही घटना लक्षात आल्यानंतर अनेक एक्सप्रेस तात्काळ थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, यामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
रेल्वे रुळाला तडे गेल्यानं सिंहगड एक्सप्रेस चिंचवडला थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व एक्सप्रेस रखडल्या आहेत. यामुळे मुंबईला येणाऱ्या पुणेकर प्रवाशांना सकाळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सिंहगड एक्सप्रेसपाठोपाठ, डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्सप्रेसही थांबवण्यात आल्या आहेत. डेक्कन क्वीन ही खडकी स्टेशनजवळ थांबवण्यात आली आहे. तर सह्याद्री एक्सप्रेस पुणे स्थानकातून अद्याप सोडण्यात आलेली नाही. सध्या चिंचवडजवळ रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम सुरु आहे. मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल हे समजू शकलेलं नाही.