बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जात असताना गेटवरती अडवण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं होतं. जवळपास अर्ध्या तास थांबल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या ऑफिसकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्या घटनेचा संबंध राजकारणाशी जोडत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. या घटनेवरती महाविकास आघाडीने देखील पोस्ट शेअर करत हल्लाबोल केला आहे.
ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं त्यांचा रस्ता...
महाविकास आघाडीच्या अधिकृत सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंट वरती या घटनेचा व्हिडिओ शेअर करून टीका केली आहे. "आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली..! देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही. ह्या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत सौ. सुनेत्रा पवार. ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं त्यांचा रस्ता तुम्ही आज अडवलंय", अशी पोस्ट महाविकास आघाडीच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून प्रतिभा पवार या बारामतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार यपगेंद्र पवार यांचा प्रचार करत होत्या. त्याचा आजच्या घटनेशी देखील संबंध लावून अनेक तर्क लावले जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर सोशल मिडियावरती अजित पवारांवर हल्लाबोल करण्यात येत आहे. मात्र, त्यांना का अडवण्यात आलं होतं त्याचं कारण अद्यापही समोर आलं नाही.
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला...
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे या दोघी बारामतीतल्या टेक्सटाइल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबवून ठेवण्यात आल्याची मला माहिती कळाली आहे. ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभं केलं, त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्या ठिकाणी थांबवलं जातंय. आता सत्ता आहे म्हणून हे ठीक आहे, ते लोकांना कसेही वागवू शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर अजित पवार यांच्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी बोलणे टाळले. राम कृष्ण हरी म्हणत त्यांनी हात जोडले.