पिंपरी चिंचवड : शहरातील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. वाकड येथे आयटी अभियंत्याने, काळेवाडीमध्ये विवाहित महिलेने तर रहाटणीत एका पुरुषाने जीवनयात्रा संपवली. विवाहित महिलेने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली तर इतर दोघांनी राहत्या घरात गळफास घेतला.


काळेवाडीच्या देल्वेरा सोसायटीत 33 वर्षीय कनिका शर्मा या चार वर्षीय मुलासोबत राहत होत्या. मूळच्या दिल्लीच्या कनिकाने आज दुपारी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. तेव्हा त्यांचं मुल घरातच होतं. हा प्रकार सोसायटीमधील नागरिकांना मोठा धक्का देणारा होता. त्यांनी तातडीने वाकड पोलिसांच्या कानावर ही बाब टाकली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, घरात छाननी केली. मोबाईलला लॉक असल्याने अधिकची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. मुलं बोलण्याच्या मनस्थितीतही नाही. पती आणि कुटुंबीय दिल्लीत राहत असून ते पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. ते इथं पोहचल्यानंतर अधिकची माहिती प्राप्त होणार आहे.


'सुशांतने मला सांगितले, तो ठीक नाही' : मुकेश छाबरा


मूळचा इंदौर येथील 32 वर्षीय आयटी अभियंता प्रशांत सेठ हिंजवडीतील एका नामांकित कंपनीत कामाला होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. त्यानंतर तो वाकडच्या कॅम्प्रेसिया सोसायटीत पत्नीसोबत राहत होता. आज दुपारी दोनच्या सुमारास पत्नी घरातच असताना त्याने गळफास घेत आत्महत्या केली. हे पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. प्रशांतने सुसाईड नोट ही लिहून ठेवली होती. त्यात त्याच्या आत्महत्येला कोणास जबाबदार धरू नये असं त्याने नमूद केलेले आहे. कोरोनामुळं आर्थिक मंदीचं सावट निर्माण झालंय पण त्याच्या नोकरीला धक्का लागलेला नव्हता. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली तर दुसरीकडे पत्नी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.


या दोन घटनांच्या तपासात वाकड पोलीस असताना रहाटणीत आणखी एक आत्महत्या झाल्याचं वृत्त समोर आलं. गेनदेव काशीद या 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लाऊन घेतला. पत्नी आणि मुलगा काल परगावी गेल्याने ते घरात एकटेच होते. आज दुपारी तीन नंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. नैराश्यातून ही आत्महत्या केली असावी अशी वाकड पोलिसांनी माहिती दिली. वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनू लागला आहे. पण कोणत्या ही समस्येवर आत्महत्या हा पर्याय मुळीच नाही. तेंव्हा टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी निदान कुटुंबीयांचा विचार हजारवेळा करायला हवा.


Pune Garden Closed | पुण्यातील उद्यानं पुन्हा बंद; वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेचा निर्णय