पुणे : पुण्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या तीन पिल्लांचा जळून मृत्यू झाला आहे. ओझरचे राजेंद्र जगदाळे यांच्या शेतातील ऊसाच्या फडात एका मादी बिबट्यानं तीन पिल्लांना जन्म दिला होता. मात्र, विजेची तार तुटल्यानं हा ऊस जळाला आणि दुर्दैवानं या आगीत होरपळून बिबट्याचे तिनही पिल्लं होरपळली.


अर्धवट जळालेला ऊस काढायला जगदाळे यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांना बिबट्याची दोन पिल्लं जळालेल्या स्थितीत आढळून आली. तिथूनच काही अंतरावर अजून एक पिल्लू मृतावस्थेत दिसून आलं. जगदाळे यांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली.

वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी मादी बिबट्या तिथं आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. खबरदारीचा उपाय म्हणून एक पिल्लू तिथं सोडून वनाधिकाऱ्यांनी दोन पिल्लं ताब्यात घेतली. या दोन्ही पिलांचे मृतदेह गिबसन पार्कमध्ये पुरण्यात आले.