पुणे : पुणे आज तीन गोळीबारीच्या घटनांनी हादरलं, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना कोंढव्यानजीक येवलेवाडी, दुसरी घटना चंदननगरच्या आनंदपार्क परिसरात घडली. तर तिसऱ्या घटनेत चंदननगरमधील गोळीबाराचा तपास करणाऱ्या पोलिसांवरच अज्ञातांनी गोळीबार केला.
पुण्याच्या कोंढव्यानजीक येवलेवाडीत श्रीगणेश ज्वेलर्स या दुकानात काम करणाऱ्यावर काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. दुपारी दोनच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेले चार हल्लोखोर दुकानात घुसले. हल्लेखोर आणि दुकानदार यांच्यात तुफान बाचाबाची झाली आणि यात हल्लेखोरांनी दुकानात काम करणाऱ्यांवर गोळीबार केला. गोळीबारात दुकानदार अमृत परिहार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चंदननगरच्या आनंदपार्क परिसरात दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन एका महिलेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एकता भाटी या महिलेतच मृत्यू झाला आहे. मूळचं नोएडाचं असलेलं भाटी कुटुंब दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलं होतं. एकता यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. मात्र एकता यांना घरात घुसून कुणी आणि का मारलं हे अजूनही गूढच आहे.
त्यानंतर चंदननगरमधल्या गोळीबाराचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस बाहेर पडले. त्यावेळई पोलिसांवर अज्ञातांनी पुणे रेल्वे स्थानकात गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस निरीक्षक गजानन पवार जखमी झाले. मात्र पोलिसांवर गोळ्या नेमक्या कुणी झाडल्या हे स्पष्ट झालं नाही.
मात्र पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.