पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी वादाची किनार पाहायला मिळते यावर्षी देखील असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे. यावेळी होणारं 98 वं  साहित्य संमेलन हे दिल्लीत पार पडणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजकांना धमकीचा फोन येत आहे, याबाबत त्यांना धमकावलं जात आहे. याबाबत त्यांनी एबीपी माझाशी बोलाताना सांगितलं की, फोन करणारे त्यांची मागणी सांगून धमक्या देत आहेत.


नेमकं काय आहे प्रकरण?


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, या कार्यक्रमासाठीची पत्रकार परिषद पार पडली. त्यानंतर आम्ही त्याबाबची माहिती असणारे दोन पानांचे लिफलेट वाटले. तेही अगदी फायनल नव्हते. त्यात आम्ही काही नाव दिली होती.दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे तर संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ, अन्य दोन सभागृहांना काकासाहेब गाडगीळ आणि लोकमान्य टीळकांचे नाव देऊ अशा आम्ही घोषणा केल्या. भूमिकेमध्ये आम्ही दोन्ही विचारांच्या टोकांना आम्ही साहित्य संमेलनाने नेहमी स्वीकारलं आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचे अध्यक्ष होते. आम्ही सर्वांचा उल्लेख केलेला होता. काही गैरसमजातून अशी बातमी आली की, सावरकरांचं नाव मुख्य सभागृहाला दिलं पाहिजे. पण, मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं असं ठरलं आहे. त्यामध्ये सर्वांची नावे आहेत. कुठेकुठे नाव द्यायची हे मंडळाचं ठरलेलं असतं आमची त्यामध्ये मोठी भूमिका नसते, पण त्या गैरसमजातून काही फोन यायला लागले, आधी विनंती करायचे आणि नंतर धमकी द्यायला लागले अशी माहिती यावेळी बोलताना संजय नहार यांनी दिली आहे. 


मेसेजवर, मेलवर ते विनंती...


माझ्या सोबत काम करणाऱ्यांना देखील फोन येत होते. यावेळी पहिल्यांदा विनंती करायचे नंतर स्वरुप धमकीचं होतं. फोन करणाऱ्या काहींनी तर नथुराम गोडसेचे नाव देण्याचाही आग्रह धरला. आम्ही त्याला जे काही म्हणणे आहे ते लेखी महामंडळाकडे द्यायला सांगितले. त्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. काल दिवसभर फोन आले, माझे सहकारी, कुटूंबातील काहींनी फोन आले, काहींनी नावे सांगितली, काहींनी मेल केले. तर काहींनी मेसेज केले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. मेसेजवर, मेलवर ते विनंती करत होते, तर काही जण हे केलं नाही तर त्रास होईल तुम्हाला. महाराष्ट्राच्या आस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल, असंही काही जण सांगत होते. 


मोदींच्या उपस्थितीत विज्ञान भवनमध्ये संमेलनाचे उद्घाटन..


आम्ही आयोजक आहोत. काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय महामंडळ घेईल. त्यामुळे तुम्ही त्यांना लिखीत द्या असं सांगितलं आहे, महामंडळांना सांगून काही बदल केले जातील, काहींनी संतांची नावे सुचवली होती. दरम्यान शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाला येणार आहेत. मोदींच्या उपस्थितीत विज्ञान भवनमध्ये संमेलनाचे उद्घाटन होईल तर बाकी साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडीयमवर होईल. आम्ही स्वातंत्रवीर सावरकरांच्या कार्याचा, मराठी भाषेबाबतच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे, महामंडळाला याबाबत कल्पना दिली आहे. काही नावे आम्ही सन्मानाने घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असंही पुढे संजय नहार म्हणालेत. 


याबाबत पोलीसांकडे तक्रार करणार नाही. मात्र काम असंच पुढे सुरु ठेवणार आहे, हे गैरसमजातून होत आहे, दोन्ही बाजूने गैरसमज झाले, त्यामुळे आम्ही तक्रार करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.