पुणे : दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल सात महिन्यानंतर हा चोर पोलिसांच्या हाती लागला आहे. पुलंच्या घराबरोबरच आणखी काही ठिकाणी या चोराने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.


जितसिंग राजसिंग टाक असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. टाक याने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने पु.ल.देशपांडे यांच्या घरी चोरी केली होती. त्यापैकी एकजण यापूर्वीच्या एका गुन्ह्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत आहे. तर अन्य दोघाचा शोध पोलिस घेत आहेत.


पुण्यातील भांडारकर रस्त्यावर मालती-माधव नावाच्या इमारतीमध्ये पु.ल.देशपांडे यांचे दोन फ्लॅट आहेत. पु.ल.यांचे साहित्यसंपदा आणि काही वस्तू एका फ्लॅटमध्ये होत्या. नेमक्या याच सदनिकेत 19 डिसेंबर 2017ला पहाटे 2 वाजता चोरी झाली होती. शेजाऱ्यांच्या लक्षात हे सारं आल्यानंतर त्यांनी पुलंच्या नातेवाईकांना कळवलं होतं. त्यानंतर पुलंच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.


चोरट्यांनी कुलूप तोडून पुलंच्या घरात प्रवेश केला आणि कपाटांचेही कुलूप तोडले होते. पुलंची हस्तलिखितं आणि पुस्तकं चोरांनी अस्ताव्यस्त केली. त्यापलिकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे तिथून त्यांनी पळ काढला होता. पुलंच्या घरात पुस्तकांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागलं नसल्याचा दावा पुलंचे भाचे दिनेश ठाकूरांनी केला.


दरम्यान, चार वर्षांपूर्वीही पुलंच्या घरात चोर घुसले होते. मात्र तेव्हाही त्यांच्या हाती काही लागले नव्हते. कारण पुलंच्या घरातील सर्व कपाटं केवळ पुस्तकं आणि हस्तलिखितांनीच भरली आहेत, अशी माहितीही पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांनी दिली.