पुणे : पुणेकरांचे बौद्धिक कौशल्य, टोमणे, उपदेश या सर्वांचा एकत्रित आस्वाद घ्यायचा असेल तर तुमच्यासमोर एक उत्तम पर्याय म्हणेजे पुणेरी पाट्या. घराच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी, अगदी हॉटेलमध्ये थोड्या विनोदी, तिरकस पण मार्मिक अशा पाट्या दिसल्या की समजावं तुम्ही पुण्यातच आहात.

अशा शे-दिडशे एकत्रित पाट्यांचं प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन पाहिल्यावर तुम्ही पोट धरुन हसाल यात शंका नाही.



पुणे तेथे काय उणे, असे कायम म्हटले जाते. याची प्रचिती पुण्यात गेल्यावर नक्कीच येते. पुण्याचा दगडुशेठ हलवाई गणपती, शनिवार वाडा, चितळेंची बाकरवडी जशी प्रसिद्ध आहे तशाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे, पुणेरी पाट्या.



पुण्यातल्या काही गोष्टी अगदी सातासमुद्रापार प्रसिद्ध आहेत. त्यात पुण्यातल्या पाट्या पहिल्या क्रमांकावर येतात. पुण्यातल्या पाट्या म्हणजेच पुणेरी लोकांची मार्मिक टिप्पणी असते.



या पाट्यांद्वारे पुणेकरांचा स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत, उपरोधिक टीका, कधी फटकळ, मात्र तेवढंच स्पष्ट, लोकांना योग्य संदेश जावा यासाठी या पाट्यांची निर्मिती झाली आहे. अशाच पाट्या तुम्हाला एकत्रित पाहता येणार आहेत.