Harshvardhan Patil : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकल्यानंतर इंदापूरमध्ये वाद रंगला असताना पुन्हा एकदा नवा वाद उभारण्याची शक्यता आहे. इंदापूर काँग्रेस भवनचा ताबा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे. काँग्रेस भवन जोपर्यंत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी काँगेस पक्षाकडे केली आहे.


हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेस भवनावरून विरोध


हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर शरद पवार गटातील नाराज नेते आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने भरत शहा यांनी  हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला आहे. आणि आता आमदार संजय जगताप यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेस भवनावरून विरोध दर्शवला आहे. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत काल आमदार संजय जगताप यांची बैठक झाली. त्यानंतर इंदापुरातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस भावनाचा मुद्दा पुढे केला. त्यानंतर आमदार संजय जगताप यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे जोपर्यंत इंदापूर पक्ष कार्यालय पुन्हा एकदा काँग्रेसला मिळत नाही. तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे केली आहे.


काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून हर्षवर्धन पाटलांना विरोध 


दरम्यान, इंदापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असणारी इंदापूर काँग्रेसची इमारत जोपर्यंत ते पक्षाला परत करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचं काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काँग्रेसची इमारत परत करा मगच आम्ही त्यांचं काम करू असं या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.


इंदापूरात मेळावा घेत शरद पवारांनाही इशारा


दुसरीकडे, इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात शरद पवारांच्या पक्षातील नेते एकवटल्याचं चित्र आहे. प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शाह यांच्या उपस्थितीत इंदापुरात परिवर्तन मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा नाहीतर महाराष्ट्रातील मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल. असा इशारा दशरथ माने यांनी परिवर्तन मेळाव्यातून इशारा दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या