Pune News: पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात टाकून एका आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्यात या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्याचा सुखरुप बचाव केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला.  आईशी संपर्क झाल्यावर पोलिसांनी त्याला आईकडे सुपूर्त केलं आहे.


नक्की काय घडलं?
शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सद्दाम शेख व अजित पोकरे यांना बागुल उद्यानाजवळील आंबील ओढा नाल्यात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. काही वेळातच हे हवालदार धारेवर पोहोचले. पोलीस कर्मचारी पोकारे व शेख यांनी दोरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीला ओढ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाने त्यांना ढकलून पाण्यात उडी मारली. त्यानुसार शेखनेही पाण्यात उडी मारली.


शेखने तरुणाला ओढ्याच्या बाजूला ओढले आणि त्याचा जीव वाचवला. हा प्रकार घडत असताना शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी आपल्या मोबाईलवरून ही घटना रेकॉर्ड केली. या व्हिडियोत हा आत्महत्येचा थरार बघायला मिळतो आहे. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं दिसत आहे. पुणे शहर पोलिसांचे शेख आणि पोकारे यांच्या धाडसाचे आणि कामाचे सर्वांनी कौतुक केले. त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


पुणे पोलिस कायम तत्पर
पुणे पोलीस प्रत्येक संकटाच्यावेळी पुणेकरांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. त्यात एखाद्या वस्तीत बाळ सापडल्याचं प्रकरण असो, जेष्ठ नागरिकांना मदत असो किंवा महिलेवर होणारे अत्याचार असो या सगळ्यापासून सुरक्षित ठेवण्याचं काम पुणे पोलीस कायम करत असतात. त्यामुळे पुणेकर रात्रंदिवस मुक्त संचार करु शकतात. अनेकदा पोलिसांनी केलेल्या कामाचं पुणेकर मनभरुन कौतुक करताना दिसतात. आपल्या कुटुंबीयांची पर्वा न करता स्वत:चा जीव घोक्यात टाकून दुसऱ्याला जीवनदान देण्याचं काम करतात.