Pune Citizen In Amarnath: पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून दरवर्षी भाविक जातात. यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला आहे. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तराखंड प्रशासनाकडून अधिकची माहिती घेत आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवज शहरातून अनेक भाविक अमरनाथ यात्रेला जात असतात. मोठ्या भक्तीने ते यात्रा करतात. मात्र यावर्षी मोठी दुर्घटना घडल्याने अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
एनडीआरएफचे (NDRF) महासंचालक (DG) अतुल करवाल यांनी माहिती देताना सांगितलं आहे की, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. NDRF पथकाकडून बेपत्ता यात्रेकरुंचा शोध सुरु आहे. सुमारे 40 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्या पथकाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. मात्र तरीही काही जणांचा शोध अजूनही सुरु आहे.
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली होती त्यामुळे अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात काही लंगर आणि तंबू वाहून गेले होते. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीस, एनडीआरएफ आणि एसएफकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी विमानाने रूग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांचा देखील यात समावेश आहे.
अमरनाथ गुहेच्या सखल भागात शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली होती. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पहलगाम संयुक्त पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती.