Pune Citizen In Amarnath:अमरनाथ यात्रेला गेलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. यात एक भाविक पिंपरी चिंचवड तर दुसरे भाविक पुण्यातील आहेत. पिंपरी येथील पुरुष भाविक असून ते या संकटातून बाहेर आले होते, मात्र नंतर त्यांना हृदयवीकाराचा धक्का बसला होता. तर पुण्यातील एक महिलेचा मृतामध्ये समावेश आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान काल झालेल्या ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक अजुनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच काल झालेल्या या सगळ्या दुर्घटनेत पुण्यातील अनेक भाविक अडकल्याची माहिती मिळत होती. 


पुण्यातील धायरी येथे असणाऱ्या भोसले कुटुंबाचे देखील तीन सदस्य हे या यात्रेसाठी गेले होते. ज्यामध्ये सुनीता भोसले यांचं दुःखद निधन झालं आहे. धायरी मध्ये राहणारे महेश राजाराम भोसले,सुनिता महेश भोसले,प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे देखील बेपत्ता झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धायरी येथे भोसले कुटुंबाची भेट घेत त्यांच सांत्वन करत जिल्हा प्रशासनाशी भोसले कुटुंबाचा संपर्क देखील करून दिला आहे.


पिंपरीतील मृत्यू झालेले नागरिक सुखरुप परतले होते. मात्र परतल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी जागीच प्राण सोडले, अशी माहिती अमरनाथ यात्रा आयोजक शुभम खेडेकर यांनी दिली आहे. अमरनाथ यात्रेसाठी यावर्षी पुण्यातून एकून 50 भाविक गेले होते. त्यातल्या अनेक नागरिकांशी सकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता.


अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला होता. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय उत्तराखंड प्रशासनाकडून अधिकची माहिती घेत आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली होती यातच आतपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.