Pune Porsche Car Accident : पुण्यातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने दारुच्या नशेत भरधाव पोर्शे कार चालवत कल्याणी नगरमध्ये दोघांना चिडून मारल्यानंतर पुण्यातील प्रशासकीय यंत्रणा किती पोखरली गेली आहे याचाच पुरावा दररोज समोर येत आहे. अग्रवालच्या पोराने केलेल्या पराक्रमानंतर पुण्यातील पोलीस, ससून रुग्णालय, एक्साईज खाते, आरटीओ, महापालिका, मध्यरात्रीच पोहोचलेले आमदार सुनील टिंगरे, त्याचबरोबर अतिशय हास्यास्पद आणि कायद्याची लाज निघेल असा जामीन देणारे बाल हक्क मंडळ या सर्वच यंत्रणा किती खोलवर पोखरली गेली याचाही पुरावा समोर आला होता. 


दरम्यान पोर्शे कार (Pune Porsche Car Accident) अपघात प्रकरणाचा देशव्यापी संताप पसरल्यानंतर कारवाईने वेग घेतला. यानंतर सर्वप्रथम कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवडमधीलअनधिकृत बार, पब आणि रुफटाॅप हाॅटेलवर धडक कारवाई करत बुलडोझर फिरवण्यात आला. विशाल अग्रवालच्या पोराला ज्या पबमध्ये दारू देण्यात आली त्याठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली. मालक आणि व्यवस्थापक सुद्धा अटकेत आहे. 


पुण्यात पब बारवर कारवाईचा वेग मंदावला


मात्र, अपघात झाल्यानंतर ज्या वेगाने कारवाई करण्यास सुरू करण्यात आली होती तो कारवाईचा वेग मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा थंडावला आहे. अपघात घडल्यानंतर 22 मे रोजी पुण्यात तब्बल 40 ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. मात्र आता तोच आकडा 29 मेपर्यंत फक्त दोनपर्यंत येऊन पोहोचला आहे. कारवाई सुरू केल्यापासून 22 मे ते 29 मे या कालावधीमध्ये 77 प्रकरणांमध्ये कारवाई झाली. मात्र, हा कारवाईचा धडाका पहिल्या दिवसाच्या तुलनेत सातव्या दिवसांपर्यंत पूर्णतः खाली आला. त्यामुळे यांना कोणाचा वरदहस्त आहे आणि कारवाई अचानक का थंडावली अशी चर्चा पुणेकर नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. 


पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग विभागाने गेल्या सहा दिवसांमध्ये 77 अनधिकृत पब बारवर कारवाई करून एक लाख 7 हजार 299 चौरस फुटाचे बांधकाम पाडले होते. शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत रुफटाॅप हॉटेल, पब, बार असल्याची चर्चा आहे. मात्र, यांना असलेला राजकीय वरदहस्त लक्षात घेऊन कारवाई होण्यास टाळाटाळ केली जात आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही कारवाई आता पुढे चालू राहणार की नाही? याकडे सुद्धा लक्ष आहे. पुण्यामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल, पब, बारमुळे सर्वाधिक त्रास निष्पाप नागरिकांना होत असतानाही प्रशासनाचा सुस्तपणा संतापात भर टाकणारा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या