पुणे: आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना, कारखान्याच्या चालकांना आणि संबधितांना काही अडचण आल्यास मला संपर्क साधा. त्याचबरोबर संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय असण्याची गरज आहे, असं म्हणत मदतीची ग्वाही दिली आहे.
समस्या येतात त्या सोडवत आपण इथपर्यंत आलो
यावेळी कार्यक्रमाला जमलेल्या शेतकऱ्यांना, कारखाना चालकांना आणि उत्पादकांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटकडून शेतकऱ्यांसाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत, कारखानदारी मध्ये अनेक समस्या येतात त्या सोडवत आपण इथपर्यंत आलो आहोत तरी नवीन प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात चांगला बियाणं आपल्या शेतकऱ्यांना मिळावे, काय नवीन व्हरायटी आहे ती पुढ आली पाहिजे त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काम करता इतरही अनेक सहकारी त्यामध्ये काम करत असतात, त्यामध्ये शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सुरू आहे, सर्वजण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
ऊस तोडणीसाठी भविष्यात हार्वेस्टरचा उपयोग...
आम्ही पाच वर्षांसाठी सत्तेत आलो आहे. संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय असण्याची गरज आहे. सध्या वाटेल त्या पद्धतीने गुळ तयार केला जातो आहे. मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करुन गूळ आणि गुळ पावडर तयार केली जाते. मात्र हे करताना नियम पाळले जात नाहीत.अशावर बंधनं घालण्याचा आमचा विचार आहे. ऊस तोडणीसाठी भविष्यात हार्वेस्टरचा उपयोग करावा लागेल. मांजरा कारखान्याने १०० टक्के उसाची तोडणी हार्वेस्टरने करुन दाखवली तर इतरांना ते का जमणार नाही? असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.
साखर कारखान्यांना वीज निर्मिती करताना योग्य दर मिळाला पाहिजे. मात्र तो मिळत नाही. सध्या एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने घेतलं जातंय. मी त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. रमजानच्या वेळी साखर निर्यात करा. त्यामुळे फायदा होईल. आत्ता साखर विकण्याची घाई करू नका. जिथे राज्य सरकारची मदत लागेल तिथे माझ्याकडे या, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
...तो निर्णय शरद पवार घेतील
ऊस शेतीत एआयचा वापर करण्यात येईल. केंद्र सरकारला इथेनॉलचे दर वाढवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते. आज दहा हजारला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी यावेळी केली आहे.