जळगाव: जळगाव जिल्ह्यात बुधवारी (22 जानेवारी) दुपारी एक भयंकर रेल्वे अपघात (Jalgaon Train Accident) घडला. या अपघातात (Jalgaon Train Accident) 13 लोकांचा मृत्यू झाला असून, 10 लोक गंभीरपणे जखमी झाले आहेत. लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी थेट रेल्वेतून खाली उड्या घेतल्या. त्यानंतर अचानक गोंधळ उडाल्याने रेल्वेतील (Jalgaon Train Accident) चैन ओढली. त्यानंतर अनेकांनी त्यातून उड्या मारल्या, यावेळी बाजुच्या रेल्वे रुळावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसली आणि प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले, अनेक जण जखमी झाले. ज्यामध्ये 13 जणांना आपला जीव गमवला आहे. हा अपघात (Jalgaon Train Accident) कसा आणि का घडला? नेमकं काय झालं याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.


उदल-विजयने चहावाल्याच 'आग-आग' ऐकलं 


अजित पवारांनी माहिती देताना म्हटलं, या रेल्वेमध्ये उदल कुमार ( वय 30 वर्षे, उत्तर प्रदेश) हे लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्सप्रेसने रोजगारासाठी मुंबईकडे यायला निघाले होते. त्याच्यासोबत त्याचा मेहुणा विजयकुमारही होता. यावेळी ते सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसले होते. त्यावेळी रेल्वेच्या रसोईतील चहा विक्रेत्याने आग लागली, आग लागली अशी ओरड केली. अशी आरोळी ऐकू येताच, बोगीत अचानक गोंधळ उडाला. आजुबाजुच्या बोगीमध्येही गोंधळ उडाला.


त्यावेळी काही प्रवाशांनी घाबरुन स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून दोन्ही बाजुने उड्या घेतल्या. यावेळी रेल्वे गाडी खूप वेगात होती, त्यामुळे एका प्रवाशाने साखळी ओढली आणि रेल्वे थांबवली. त्यानंतर प्रवासी गाडीतून खाली उतरु लागले. ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना शेजारीच असलेल्या रेल्वे रुळावरुन जात असताना बंगळुरु-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वे रुळावर असलेल्या प्रवाशांना धडक देऊन काही अंतारावर पुढे जाऊन थांबली. त्यावेळी बऱ्याच प्रवाशांच्या शरीराची इतकी दुर्दशा झाली, की ती मी सांगूही शकत नाही, यामध्ये काही प्रवाशी मृत्यूमुखी पडले तर काही जखमी झाले. यामध्ये उदल कुमार आणि विजय कुमार दोघांनाही धडक बसली आणि ते जखमी झाले. यामध्ये 10 मृतदेह सापडले आहेत, तर तीन मृतदेहांच्या शरीराचे भाग विखुरले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 


कसा झाला अपघात?


- जळगाववरुन मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसचा अचानक ब्रेक लागल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी डब्यात आगीची चर्चा सुरू झाली.
- यावेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. 
- दुर्दैवानं समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसची प्रवाशांना धडक बसली.
- या घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. जखमींवर आता उपचार सुरू आहेत.