Santosh Bangar: हिंगोलीचे शिंदे समर्थक आमदार यांचा संतोष बांगर यांनी पुण्यातील आरोग्य आयुक्तांना फोन करुन खडसावलं असल्याचं समोर आलं होतं. रुग्णवाहिका चालकांना योग्य पगार न दिल्याचा आरोप करत संतोष बांगर यांनी आयुक्तांना खडसावलं होतं. फोनवरुन अर्वाच्च भाषेत आरोग्य आयुक्त डॉ. नितीन अंबोडकर खडसावलं होतं. त्यानंतर आता जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने बांगर यांच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना निवेदन देत निषेध नोंदवला आणि आमदारांना समज विनंती केली आहे.


कंत्राटी आणि बाह्ययंत्रणांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीचे पत्र व्यवहार देखील कऱण्यात आले आहे. असं असताना फोन न उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरुन राज्यस्तरीय अधिकाऱ्याबरोबर अर्वाच्च भाषेत बोलणं आणि ते प्रसारमाध्यमापर्यंत पोहचवून अशा प्रकराचं वक्तव्य करणं योग्य नाही. त्यांनी अधिकारी आणि आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने केला आहे.


कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. अनेकदा त्यांनीदेखील प्रसार माध्यमांमध्ये बातम्या देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मात्र त्यांचा पगार वेळेवर होण्यासाठी योग्य नियोजन सुरु आहे. त्याचा पाठपुरावादेखील करत असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे. 


आरोग्य विभागात अनेक कामं 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक विभाग सोपवण्यात आले आहे. कोरोनानंतर अनेक विभागाचा पाठपुरावा केद्राकडून केला जात आहे. त्यामुळे बैठका आणि व्हिडीओ कॉन्फरंसींगमध्ये अधिकारी अडकले आहेत. या सगळ्यांचा त्यांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होत आहे. तरीदेखील आरोग्य विभाग सगळ्या संकटानंतरही अव्वल कामिगरी बजावत आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे.


चार आरोग्य संघटना बांगर यांच्या विरोधात
चार महत्वाच्या आरोग्य संघटनांनी थेट सरकारला पत्र देत निषेध नोंदवला आहे. त्यात महाराष्ट्र राज्य आरोग्य अधिकारी संघटना,जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग संघटना, मॅग्मो संघटना आणि आरोग्य अधिकारी संघटना या चार संघटनांचा समावेश आहे. बांगर यांनी केलेल्या कृत्यावर चारही संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. 


काय होती ऑडिओ क्लिप?
आमदार संतोष बांगर आणि डॉ. नितीन अंबोडकर यांचं संभाषण होतं. या क्लिपमध्ये बांगर यांनी आरोग्य आयुक्तांना दम दिला होता. पगार कशाचा घेता? काम करायचं नसेल तर पगारही घेऊ नका? लोकप्रतिनिधींचा फोन न उचलता त्यांना मेसेज करता की मेसेजवर बोला म्हणून. जरा ध्यान जाग्यावर ठेवून काम करायचं. पगार कसा घेता, काम करताना हिसाबात काम करा, अशी भाषा या फोनवरील संभाषणात बांगर यांनी वापरली होती.