Nitin Gadkari : शेतीच्या विकासासाठी बियाणांचा विकास करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. कृषी उत्पादन संस्थांचे काम महाराष्ट्रात उत्तम चालू  असून मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. आपली शक्ती स्थळे आणि आपल्या दुर्बल बाजू विचारात घेऊन पुढची वाटचाल करणं गरजेचं असल्याचं गडकरी म्हणाले. पुण्यात आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर तसेच टाकाऊ वस्तूपासून संपत्ती निर्मिती करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.


कृषी विकासदर 12 टक्क्यांवर 20 टक्क्यांवर जाणं गरजेचं


एका व्यक्तीसाठी टाकून द्यायचा कचरा हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठीचा आवश्यक भाग असू शकतो. हे सांगताना गडकरींनी वरळी बांद्रा सी लिंक प्रकल्पाचे उदाहरण दिले. देशातील गरिबी, बेरोजगारी दूर करण्यासाठी सध्या कृषी विकासाचा असलेला 12 टक्के दर हा किमान 20 टक्क्यांपर्यंत जाणे अत्यंत गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. कृषी उत्पादनांचे दर हे जागतिक परिस्थितीवर अवलंबून असल्यानं शेतीमधील अनिश्चितता वाढली आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये जर गहू साडेसहा रुपये किलोने विकला जात असेल तर आपल्याकडील गव्हाला बाजारपेठ मिळणे अवघड असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. 


उत्पन्न वाढीसाठी तेलबिया उत्पादनाकडे वळणे गरजेचं


खाद्यतेल आयात करण्यासाठी आपण दरवर्षी दीड लाख कोटी रुपये खर्च करत आहोत. त्यामुळं कृषी क्षेत्रानं आता उत्पन्न वाढीसाठी तेलबिया उत्पादनाकडे वळणे गरजेचे आहे. कारण तांदूळ, गहू, साखर अशा अतिरिक्त उत्पादन होणाऱ्या पिकांना दिवसेंदिवस कमी भाव मिळत असल्याचे गडकरी म्हणाले. आपला देश दरवर्षी सोळा लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करत आहे. यातील किमान पाच लाख कोटी रुपये आपण शेती क्षेत्राकडे जर वळवू शकलो तर आपला शेतकरी अन्नदाता होण्याबरोबरच ऊर्जा दाता व्हायला वेळ लागणार नसल्याचे ते म्हणाले.


साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल


देशाची साखरेची गरज 280 लाख टन असताना, उत्पादन 360 लाख टनांपेक्षा जास्त आहे. ब्राझीलमधील परिस्थिती पाहता या अतिरिक्त उत्पादनाचा उपयोग केला जाऊ शकतो. इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यानं आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल असे गडकरी म्हणाले. गेल्यावर्षी भारतातील इथेनॉल निर्मितीची क्षमता 400 कोटी लिटर इतकी होती. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही खूप उपाय योजले आहेत. बायोइथेनॉल वर चालवल्या जाणाऱ्या पॉवर जनरेटरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची ही वेळ असल्याचं गडकरी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: