पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. आता तर थेट गुरुनेच शिष्येवर अत्याचार केलाय. एक दोन नव्हे तर सहा ते सात मुलीचं लैंगिक शोषण या नराधम शिक्षकाने केल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरु होता. पीडित मुलींनी याची तक्रार करूनही मुख्याध्यापकांनी प्रकरण दडपलं होतं. या शिक्षकाचं बालाजी डोंबे असं नाव आहे.
शिक्षक आणि मुख्याध्यापकासह अन्य दोन शिक्षकांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. या चार शिक्षकांचं शाळेकडून निलंबन करण्यात आलं आहे. घटनेची माहिती असूनही त्याची तक्रार न केल्यामुळे मुख्याध्यापक आणि इतर दोन शिक्षकांना आरोपी करण्यात आलं आहे.
डोंबे विद्यार्थिनींना शाळेतील एका खोलीत आणि घरी बोलावून असे चाळे करत होता. तसेच मुलींना अश्लील चित्रफित दाखवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. 1 ऑक्टोबरला काही मुलींनी एकत्रित येऊन याची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली, पण त्यांनी यावर पडदा टाकला. अखेर प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचलं आणि या शाळेतील शिक्षकांचं बिंग फुटलं.
वरिष्ठ पातळीवर चौकशी केल्यानंतर आरोपी शिक्षकाला छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये महिला सुरक्षित आहेत का?
पिंपरी चिंचवडसाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र आयुक्तालयाच्या कामकाजाची सुरुवात झाली. स्वतंत्र आयुक्तालय असूनही बलात्कार, विनयभंग आणि छेडछाडीच्या घटनांचं सत्र सुरूच आहे.
9 सप्टेंबर रोजी आयटी अभियंता तरुणीचा हॉस्टेलमध्ये विनयभंग झाला. हिंजवडी पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी तरुणीलाच धमकावलं. या तरुणीने वकिलामार्फत थेट पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आणि मग पोलिसांनी हालचाल केली.
16 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना समोर आली. यातील एका मुलीचा मृत्यू झाला.
24 सप्टेंबर रोजी पिंपरीतून सात वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याचं समोर आलं. तीन दिवसांनी त्या मुलीचा मृतदेह आढळला.
2 ऑक्टोबर रोजी चार वर्षीय चिमुकलीवर तडीपार गुन्हेगाराकडून बलात्कार करण्यात आला.
2 ऑक्टोबर रोजीच चिंचवडमध्ये सहा वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली.
शिक्षकाकडून मुलींसोबत लैंगिक चाळे, मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2018 02:01 PM (IST)
एक दोन नव्हे तर सहा ते सात मुलींसोबत या शिक्षकाने लैंगिक चाळे केल्याची माहिती आहे. या शिक्षकासोबतच मुख्याध्यापक आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -