बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाढी सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे. आता पुन्हा नव्याने पंतप्रधान मोदींची दाढी चर्चे आली आहे, याला निमित्त ठरलय बारामतीतील एक चहावाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीतील चाहवाल्याने 100 रुपयांची मनी ऑर्डर केली आहे. ही मनिऑर्डर मोदींनी दाढी करण्यासाठी केली आहे.  


अनिल मोरे असं बारामतीतील या चहावाल्याचे नाव आहे. शहरातील इंदापूर रस्त्यावर एका खासगी रुग्णालयासमोर अनिल मोरे  चहाची टपरी चालवतात. पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. जर त्यांना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरणाचा वेग वाढवावा.  लोकांची समस्या सुटतील याची काळजी घ्यावी, असं अनिल मोरे यांनी म्हटलं.   


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पद देशाचे सर्वोच्च पद आहे. माझ्या कमाईतून पंतप्रधन मोदी साहेबांना दाढी करण्यासाठी मी 100  रुपये पाठवत आहे. नरेंद्र मोदी हे देशातील मोठे नेते असून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे.  त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु कोरोना साथीच्या आजारात ज्या प्रकारे लोकांच्या समस्या वाढत आहेत, लोकांसाठी आरोग्यासह रोजगार वाढवावा. या मागण्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग स्वीकारला असल्याचे अनिल मोरे यांनी सांगितले. 


अनिल मोरे यांनी मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवून कोरोना कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याची मागणी अनिले मोरे यांनी केली आहे. याशिवाय पुढील लॉकडाउन लागू केल्यास एका कुटुंबासाठी 30 हजार रुपये  द्या,अशी देखील मागणी मोरे यांनी  केली आहे.